अण्णांचा बंडू म्हणजे मुलखाचा बावळट...! अभ्यासात ’ढ’ अक्षर ’कीडामु़गी’ आणि ड्रॉईग तर विचारूच नका! त्यामुळे शाळेच्या स्नेहसम्मेलनातील प्रदर्शनात बंडू कोणतीही वस्तु ठेवू शकत नसे. दुस-या मुलांना छान-छान पारितोषिके मिळत. ती मुले बंडूला हिणवीत, चिडवीत. तो बिचारा दातांनी नखे कुरतडत, सारखा त्यांच्याकडे पाहत उभा राही.
यावर्षी मात्र बंडूने मनाशी निश्चय केला की कसेही करून एकतरी बक्षीस पटकवायचेच! पक्का निश्चय केल्यामुळे आपोआपच त्याला बुद्धी सुचली आणि -
ड्रॉईग मास्तर प्रदर्शनाच्या दालनात वस्तु मांडीत होते. तेथे तो हिंमतीने गेला. दोघांचे काही बोलणे झाले. बंडू बाहेर निघाला तेव्हा त्याचा चेहरा प्रफुल्लित दिसत होता. स्नेहसंमेल्न झाले, प्रदर्शनाचे उद्घाटन आणि परीक्षणही आटोपले. दुसरे दिवशी बक्षीस समारंभ होणार होता. त्या दिवशी ’एकेकाचा छंद’ ह्या संग्रह विभागातले पहिले बक्षीस ’अज्ञाताचा छंद’ या वहीला प्राप्त झाले. हा ’अज्ञात’ कोण? मुलांना प्रश्न पडला. अखेर मास्तरांनी गुपित फोडले. ती वही बंडुची होती.
कुणी तिकिटे जमवली होती, कोणी फोटोचा संग्रह ठेवला होता. कुणाचा विविध गाण्यांचा संग्रह होता. अशा निरनिराळ्या वस्तुंच्या मेळाव्यात बंडूच्या वहीलाच पहिले बक्षीस कसे मिळाले? वहीत काय होते?
मुळ कल्पना मास्तरांची होती. बंडूच्या घरी अनेक साप्ताहिके नि वर्तमानपत्रे असलेल्या गोष्टी त्यांच्या रम्य चौकटीसहित बंडूने कापल्या व जाड रंगी-बेरंगी कागदांच्या एका वहीत नीट चिकटविल्या. सुमारे तीस-चाळीस सुंदर सचित्र बालकथाचे ते एक पुस्तकच झाले. तांबड्या-निळ्या पेन्सिलीने बंडूने गोष्टींच्या चौक्टीभोवती रेषा काढल्या. मास्तरांनी वहीवर टपो-या अक्षरात नाव लिहून दिले - ’अज्ञाताचा छंद’ !
ही नाविन्यपूर्ण कल्पना परीक्षणकत्याना फार आवडली आणि बंडूला बक्षीस मिळाले. बक्षिसाचे पुस्तक घेताना बंडूच्या मुखमंडलावर प्रसन्नता झळकत होती. तो बावळटही दिसत नव्हता.
’निश्चयाने बळ, तुका म्हणे तोचि फळ.’

0 अभिप्राय:
Post a Comment